अल्लाउद्दीन लालानी - धानोरा६ हजार १०९ लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. गावात पाच वार्ड असून गावातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केला जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतीची सध्या असलेली पाणी पुरवठा योजना ही २५ ते ३० वर्षांपूर्वीची आहे. ती नादुरूस्त अवस्थेतच आहे. त्यात बिघाड आल्यावर ग्रामपंचायतीकडून आठ- आठ दिवस नळयोजना दुरूस्तीसाठी लागतात. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा खंडित होऊन जातो. गावाची वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी लक्षात घेऊन नवीन पाच कोटी रूपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्ताव ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविला. ही पाणी पुरवठा योजना वराती डोहावर उभारली जाणार होती. यात जलशुद्धीकरणाची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र हा प्रस्ताव सध्या शासनाकडे प्रलंबित आहे. धानोरा नगर पंचायत झाल्यानंतर हा प्रस्ताव मार्गी लागेल, अशी माहिती सध्या देण्यात येत आहे. गावालगत तुलावीटोला, गोमाटोला, जांगीटोला, आतलाटोला या नव्या वस्ती बसविण्यात आल्या आहे. मात्र या भागाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांना शेतीच्या रस्त्यातूनच जावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून येथे रस्ता तयार करण्यात येणार होता. मात्र हे काम प्रलंबित पडून आहे. पूर्वी हेटी धानोऱ्याचा भाग होता. ६०० लोकसंख्या असलेल्या या गावाला आता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. धानोरा ग्रामपंचायती अंतर्गत आठवडी बाजार भरतो. मात्र येथे ओट्यांची संख्या वाढविण्यात आलेली नाही. या बांधकामाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच गावात बीपीएल यादीचे सर्वेक्षणही व्यवस्थित झाले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, असे नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. वन जमिनीचे पट्टेही वाटपही रखडलेले आहे.या भागात भारत संचार निगमची एकमेव दूरसंचार सेवा आहे. वीज जाताच ही सेवा खंडित होते. मोबाईलधारक नागरिक त्रस्त आहेत. या समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही.
बसस्थानक व पाणी समस्येने धानोरावासीय त्रस्त
By admin | Updated: January 13, 2015 22:59 IST