गांधीनगर येथील तेंदूपत्ता एमएच ४० एम ७७२९ क्रमांकाच्या ट्रकने गाेंदियाकडे नेला जात हाेता. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक तेंदूपत्त्याचे पाेते भरण्यात आले हाेते. दरम्यान गांधीनगर येथील विद्युत तारांना वाहनातील पाेत्यांचा संपर्क हाेऊन शाॅर्टसर्किट झाले व आग लागली. आग गावातील इतर घरांना लागू नये यासाठी वाहनचालकाने जीव धाेक्यात घालून जळते वाहन गावाबाहेर काढले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. या घटनेत संपूर्ण वाहन जळून खाक झाले.
वाहनामध्ये एकूण १२३ पाेत्यांमध्ये एकूण ९१ हजार ४०० पुडे होते. तेंदूपत्ता धर्मेश एच. पटेल रा. गोंदिया यांच्या मालकीचे हाेता.
तेंदूपत्ता वजनाने हलका राहत असल्याने वाहनात उंचावर व जास्त रूंदीवर पाेते भरली जातात. ही वाहने ग्रामीण भागातून जातात. ग्रामीण भागात कमी उंचीवर वीजतारा राहतात. त्यामुळे वीजतारांना स्पर्श हाेऊन अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. क्षमेतेपेक्षा अधिक तेंदूपत्ता भरणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे.