सोमवारपासून रस्त्यावर मुरूम पडणार : यादी तयार करण्याच्या कामात भिडले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील वॉर्डा-वॉर्डात आवश्यक त्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यासाठी सर्व नगरसेवकांना पालिका प्रशासनाने ठिकाणांची यादी मागविली आहे. त्यामुळे बहुतांश नगरसेवक थेट वॉर्डात जाऊन नागरिकांशी चर्चा करीत आहेत. मुरूमाची गरज असलेल्या संबंधित रस्त्याची नोंद नगरसेवक प्रत्यक्ष फिरून घेत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मुरूम टाकण्याची कार्यवाही पालिका प्रशासनातर्फे सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या वतीने खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांवर मुरूम टाकण्याच्या कार्यवाहीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. संबंधित कंत्राटदाराला पहिल्या टप्प्यात १०० ब्रॉसचे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सद्य:स्थितीत चार ते पाच नगरसेवकांची आवश्यक ठिकाणे व रस्त्यांबाबतची यादी पालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. इतर नगर सेवकांकडून अद्यापही न. प. ला यादी प्राप्त झाली नाही. पालिकेच्या वतीने आवश्यक त्या ठिकाणी व अंतर्गत रस्त्यावर मुरूम टाकण्यात येणार आहे. पावसाळ्यात अंतर्गत रस्त्यांवर चिखल निर्माण होऊन नागरिकांना आवागमनास त्रास होऊ नये, याकरिता पालिकेच्या वतीने ही कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक नगरसेवकाला मुरूमाच्या ब्रॉसचा आकडा ठरवून दिल्याची माहिती आहे. तीन महिने चालणार काम पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी गडचिरोली शहरात अद्यापही मुसळधार पाऊस झाला नाही. आतापर्यंत झालेल्या हलक्याशा पावसाने विविध वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचले आहे. कार्मेल हायस्कूलच्या मागे साईनगरात चिखलाचे साम्राज्य झाले आहे. मुरूम टाकण्याची कारवाई ३ जुलैपासून सुरू होणार असली तरी संपूर्ण शहरभर मुरूम टाकण्याच्या कामात जवळपास तीन महिने लागणार आहेत. संबंधित कंत्राटदाराने गतीने मुरूम टाकण्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
वॉर्डात वाढल्या नगरसेवकांच्या चकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 01:51 IST