प्रशासकीय कामे रखडली : आलापल्ली कार्यालयातील विदारक स्थिती अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली कार्यालयातील बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामे होण्यास विलंब होत आहे. या कार्यालयाअंतर्गत करण्यात येत असलेली बांधकामे सुद्धा रखडली आहेत. आलापल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित संपूर्ण अहेरी तालुक्यातील गावे येतात. या गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फतीने दरवर्षी कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर करून ती केली जातात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला आहे. या कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाची चार पदे, वरिष्ठ लिपिकाची दोन पदे, स्थापत्य अभियंता सहायकची १४ पदे, कनिष्ठ वेतन लिपिकाचे एक पद व अभियंत्याचे तीन पदे रिक्त आहेत. अहेरी तालुका विस्ताराने मोठा आहे. त्याचबरोबर बहुतांश भाग जंगलव्याप्त असल्याने कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासते. मात्र कार्यालयातील रिक्त पदे वाढली असल्याने कामे वेळेवर होण्यास अडचण जात आहे. या विभागातील वेतन लिपीक एस. एम. परचाके यांची पदोन्नतीने चामोर्शी येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर नवीन वेतन लिपीक देण्यात आला नाही. त्यामुळे वर्ग ४ व इतर कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासूनचे वेतन झाले नाही. सण-उत्सवाचे दिवस असतानाही येथील कर्मचाऱ्यांना पैशाची कमतरता जाणवत आहे. या कार्यालयात मागील २६ वर्षांपासून सेवा करीत असलेल्या एका कर्मचाऱ्याला अजूनपर्यंत पदोन्नती सुद्धा देण्यात आली नाही. शासकीय नियमानुसार दर बारा वर्षांनी पदोन्नती होणे गरजेचे असतानाही पदोन्नती झालेली नाही. त्यामुळे सदर कर्मचारी त्रस्त झाला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम विभागाला रिक्तपदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 01:26 IST