पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आष्टी ठाण्याचे लोकार्पणआष्टी : सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठीच पोलिसांची नेमणूक झाली असली तरी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सण, उत्सव या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी सामान्य नागरिक व पोलिसांनी दक्षता घेतली पाहिजे, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे नव्यानेच पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस स्टेशनचे उद्घाटन गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, मंजुनाथ शिंगे, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, सरपंच वर्षा देशमुख, प्रकाश गेडाम, अवधेशरावबाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी आष्टी येथे पोलीसमित्र संकल्पना राबविली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. संचालन आष्टीचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलीस जवानांनी सहकार्य केले.
पोलीस व नागरिकांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण करा
By admin | Updated: November 21, 2015 01:54 IST