सिरोंचा : प्रत्येक व्यक्ती हा धावपळीच्या जीवनात वैद्यकीय, लाॅ व अभियांत्रिकी या क्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आता या क्षेत्रातसुद्धा स्पर्धा वाढली असल्याने सर्वांना यश मिळत नाही. आदिवासीबहुल दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त कलागुण आहेत. या सुप्त कलागुणांतून करिअर घडवावे, असे आवाहन सिराेंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी केले. गडचिरोली पोलीस दल व पोलीस स्टेशन सिरोंचा यांच्या वतीने आयोजित वीर बिरसा मुंडा व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. ही स्पर्धा १६ ते १८ फेब्रुवारी अशी तीन दिवस चालणार आहे.
याप्रसंगी प्रामुख्याने सिरोंचा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी अजय अहिरकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल धविले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके, वैद्यकीय अधिकारी पेदाला, माजी नगराध्यक्ष मोगलराज पेदापल्ली, शिक्षक वासुदेव दुर्गम, पत्रकार मोहम्मद इरफान आदी मान्यवर उपस्थित हाेते.
युवक हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे. सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धेचे आयाेजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून युवतींनी आत्मरक्षणाचे धडे घ्यावे, असे आवाहन पत्रकार इरफान यांनी केले.
यामध्ये प्रथम पारितोषिक राेख ३ हजार, द्वितीय बक्षीस २ हजार व तृतीय बक्षीस १ हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संचालन रंजीत गागापूरवार यांनी तर आभार पीएसआय श्रीकिशन कांदे यांनी मानले.