गडचिरोली : सातबारावर कर्जाचा बोझा चढवून देण्यासाठी शेतकऱ्याकडून ५०० रूपयाची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगळवारी दुपारी १ वाजताच्या सापडा रचून रंगेहाथ अटक केली. लाचखोर तलाठ्याचे नाव खुशाल हरिशचंद्र बांबोळे साजा क्र. २० तालुका गडचिरोली असे आहे. प्राप्त माहितीनुसार गुरवळा (राखी) येथील शेतकरी तुकाराम कानू गांधरवार (६८) हे सातबारावर कर्जाचा बोझा चढवून मागण्यासाठी कार्यालयात गेले. दरम्यान तलाठी खुशाल बांबोळे यांनी या कामासाठी ५०० रूपयाची लाच मागितली. याबाबीची तक्रार तुकाराम गांधरवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे केली. पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापडा रचून तलाठी बांबोळे याला ५०० रूपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. आरोपी विरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक मतकर, अप्पर पोलसी अधीक्षक रोशन आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार, पोलीस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलीस नाईक रवींद्र कत्रोजवार, परिमल बाला, वसंत जौजाळकर, नरेश आलाम, उमेश मासुरकर यांनी केली.गेल्या दोन महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळे रचून अनेक लाचखोरांंना आपल्या जाळ्यात अडकविले आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाढत्या धाडसत्रामुळे लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. असे असताना सुध्दा भीतीपोटी अनेक नागरिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच प्रकरणाची तक्रार करीत नसल्याने लाच घेण्याचे प्रकरण दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: July 8, 2014 23:27 IST