गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पोर्चवर शेकडो लिटर पाणी साचून राहत असल्याने या ठिकाणी डासांची पैदास होत असून याचा त्रास रुग्णालयातील रुग्णांनाच होत आहे. याकडे जिल्हा रुग्णालयाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोर्च बांधण्यात आले आहे. या पोर्चच्या वरच्या बाजूस टाकीप्रमाणे बांधकाम करण्यात आले आहे. पावसाचे पाणी या ठिकाणी साचून राहू नये, यासाठी पाईप लावण्यात आले आहेत. मात्र कचऱ्यामुळे सदर पाईप पूर्णपणे बुजले आहे. पाच दिवसांपूर्वी गडचिरोलीत मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे पाणी पोर्चवरील टाकीमध्ये जमा झाले आहे. पाईप बुजला असल्याने ते पाणी आठ दिवसांपासून जमा होऊन आहे. रुग्ण फेकत असलेल्या खाण्याच्या वस्तू या ठिकाणी कुजून दुर्गंधीयुक्त वास रुग्णांना येत आहे. त्याचबरोबर या पाण्यामध्ये डासांची पैदासही वाढली आहे. सतत पाणी साचून राहिल्यामुळे स्लॅबलाही धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी आठ दिवसांपासून पाणी याच पाण्याच्या टाकीमध्ये साचून आहे. बुजलेला पाईप दुरूस्त न केल्यास पाणी याच ठिकाणी पावसाळाभर साचून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोर्चच्या वरच्या बाजुला खिडकी आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक या खिडकीमधून अनावश्यक वस्तू फेकतात. त्यामुळे कचऱ्याचा ढीग पोर्चवर जमा झाला आहे. पोर्च तसेच खिडकीची साफसफाई करणे आवश्यक आहे. याकडे रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
रुग्णालयाच्या पोेर्चवर डासांची पैदास
By admin | Updated: June 14, 2016 01:04 IST