गडचिरोली : वृध्द, निराधार व अपंग नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ३५१ नागरिकांना दिला जात आहे. संपूर्ण आयुष्य समाज व कुटुंबाच्या हितासाठी खर्ची घातल्यानंतर काही नागरिकांना वृध्दापकाळात मात्र निराधाराचे जीवन जगावे लागते. वृध्दापकाळात शरीर पूर्णपणे थकले असल्याने मोलमजुरी करून पैसे कमविण्याची व स्वत:च्या बळावर जीवन जगण्याची शक्ती राहत नाही. परिणामी काही नागरिकांना तर नाइलाजास्तव भीक मागूनही जीवन जगावे लागते. आयुष्यभर स्वाभीमानाने जगलेल्या नागरिकाला वृध्दापकाळात मात्र अशा यातना सहन कराव्या लागतात. परिणामी काही वृध्द आत्महत्येचाही मार्ग स्वीकारतात. ही पाळी त्यांच्या येऊ नये त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे व त्यांना औषधपाण्याचा खर्च करता यावा यासाठी शासनाकडून मासिक अनुदान दिले जाते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यासही सदर कुटुंब उघड्यावर पडते. मुलाबाळांना जगविण्याचा प्रश्नही निर्माण होतो. त्याचबरोबर अपंगाला तर जीवन जगतानाच मरणयातना सहन करावा लागतात. या सर्व निराधारांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे. त्यांच्या जीवनातील दु:खाचा अंधार थोडाफार कमी व्हावा यासाठी केंद्र व राज्यशासन विविध योजना राबविते. गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५ हजार ३५१ नागरिकांना या योजनांचा लाभ दिल्या जात आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १६ हजार १०४, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ५३ हजार २१०, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे ३३ हजार ८७ इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे २ हजार १७१, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे ३८३ नागरिक व राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजनेचे ३९६ नागरिक यांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून मासीक ६०० रूपये अनुदान दिले जाते. अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात महिन्याच्या शेवटी जमा केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढू शकते. दुर्गम भागात योजनांची जनजागृती केल्यास लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. (नगर प्रतिनिधी)
एक लाख निराधारांना अनुदानाची ऊब
By admin | Updated: December 21, 2014 23:00 IST