कोरची : जि. प. सदस्य सुनंदा आतला यांनी आज मंगळवारी दुपारच्या सुमारास कोरची तालुक्यातील बोटेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, सदर प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप बंद असल्याचे आढळून आले. दुपारी २ वाजताच्या सुमारास बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कोणतेही आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याचे जि. प. सदस्य सुनंदा आतला यांना दिसून आले. सदर प्राथमिक आरोग्य केंद्र दुपारी २ वाजता कुलूप बंद असल्याचे आढळून आले असले तरी सायंकाळी ४ वाजता सदर दवाखाना सुरू व्हायला पाहिजे होते. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप बंद असल्याने दोन रूग्ण केंद्राकडे येऊन परत गेल्याचे सुनंदा आतला यांना आढळून आले. दिवसातून दोनदा ओपीडी सुरू असायला पाहिजे. सायंकाळी ५ वाजतानंतर काही वेळाने परिचारिकांनी या आरोग्य केंद्राचा दरवाजा आतून उघडला. या आरोग्य केंद्रात एकच परिचारिका नियुक्ती करण्यात आली आहे. बरेचदा या परिचारिकेला लगतच्या गावामध्ये दौऱ्यावर जावे लागते. त्यानंतर सदर आरोग्य केंद्रात परिचारिका उपलब्ध नसते. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. कोरची तालुक्यातील अनेक गावात रूग्ण आजाराने फणफणत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत बोटेकसासारख्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे आहे, असेही जि. प. सदस्य सुनंदा आतला यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
बोटेकसा प्राथ. आरोग्य केंद्र बंद
By admin | Updated: September 2, 2014 23:44 IST