आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा वन्यजीव अभयारण्यातील हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येथील नदीकिनाऱ्या जवळ विभागाच्यावतीने १९९६ निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले होते. या निसर्ग परिचय केंद्रातून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे राहणीमान, त्यांचे जीवनमान व जंगलातील विविध प्राणी, पक्षी यांची माहिती दिली जात होती. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हे निसर्ग परिचय केंद्र आता भकास झालेले आहे.या निसर्ग परिचय केंद्राचे उद्घाटन १९९६ ला तत्कालीन वनमंत्री चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. चपराळा येथे यात्रेनिमित्त येणारे असंख्य भाविक या परिचय केंद्रात भेट देऊन गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव परिस्थिती जाणून घेत होते. त्यानंतर या वास्तूकडे वन विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले. आज स्थितीत वास्तूमधील फ्लोरींगला भेगा पडल्या आहेत. इमारतीत इलेक्ट्रीक बोर्ड तुटलेले आहेत. त्यामुळे वायर लोंबकळत आहेत. लाईटवर धूळ साचलेली आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेली आदिवासीची झोपडी आणि अन्य वस्तूवर धुळ जमा झाली. बरेचसे साहित्य नाहिसे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना निराशाच पदरात पडत आहे. या वास्तूच्या मागील बाजुला पर्यटकांसाठी शौचालय व बाथरूम बांधले. परंतु त्याचीही दुरावस्था झाली. सोलर प्लेट येथे लावली. परंतु खांबावर लाईट नाही. बाहेर लावण्यात आलेल्या निसर्ग परिचय केंद्राच्या फलकाचे अक्षर गळून पडले आहेत. लाखो रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या वास्तुची दुरावस्था झाली. चपराळा येथे वर्षभर असंख्य भाविक व शाळांच्या सहली येतात. निसर्ग परिचय केंद्राला भेट देतात. मात्र निराशा पदरी घेऊन परत जातात. वन खात्याने या अभयारण्याच्यास विकासासाठीही फारसे प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे इतर भागासाठी पर्यटक इकडे येत नाही, अशी परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)
चपराळातील निसर्ग परिचय केंद्र भकास
By admin | Updated: March 30, 2015 01:31 IST