ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, ता.१४: गोदाम बांधकाम केल्याची ताबा पावती देण्यासाठी कंत्राटदाराकडून २५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली तालुक्यातील बोदली येथील ग्रामपंचायतीचा सरपंच आकाश गजानन निकोडे(२४) यास रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा कंत्राटदार असून, त्याला जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामपंचायत बोदली येथे शासकीय गोदाम बांधकामाचे कंत्राट मिळाले होते. २०१५ च्या अधिकारपत्रान्वये गोदामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकाम पूर्ण झाल्याने तक्रारकर्त्या कंत्राटदाराने सरपंच आकाश निकोडे याची भेट घेऊन ताबा पावती देण्याची विनंती केली. परंतु सरपंच आकाश निकोडे याने ताबा पावती देण्यासाठी तक्रारकर्त्या कंत्राटदाराला २५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज गडचिरोली येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी सरपंच आकाश निकोडे यास तक्रारकर्त्याकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. एसीबीने निकोडेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(ड)सह १३(२)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे, पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे,सत्यम लोहंबरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, मिलिंद गेडाम, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, स्वप्नील वडेट्टीवार, संदीप कुरवटकर यांनी ही कारवाई केली.