अहेरी : येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या सीआरपीएफ ३७ क्रमांकाच्या बटालियनने शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या रक्तदान शिबिरादरम्यान बटालियनच्या २५ जवानांनी रक्तदान केले. जिल्ह्यात तैनात करण्यात आलेले सीआरपीएफचे जवान नक्षल्यांसोबत लढण्याबरोबरच लोकोपयोगी उपक्रमांचेही आयोजन करतात. याअंतर्गतच रक्ताचे महत्व लक्षात घेऊन ३७ क्रमांकाच्या बटालियनने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी बटालियनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गेब्रीयाल टाये, तालुका ंवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. कुमरे, डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार, पंकज नैनुरवार, रक्तसंक्रमण विभागाचे शिरीन शेख, शरद बांबोळे, गोपाल महतो यांच्यासह बटालियनचे सर्व अधिकारी व जवान उपस्थित होते. यावेळी बटालियनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गेब्रीयाल टाये यांनी जवानांना मार्गदर्शन करताना रक्तदानाचे महत्व पटवून सांगितले. प्रत्येक नागरिकाने स्वच्छेने रक्तदान करावे, रक्तदान केल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचण्यास फार मोठी मदत होते, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी जवानांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
अहेरीत २५ जवानांचे रक्तदान
By admin | Updated: December 20, 2014 01:37 IST