शिवसेना व राकाँला मोठा फटका : काँग्रेसही लाखाच्या घरात गडचिरोली : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात प्रचंड मोठी मुसंडी मारली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक जागा भाजपला या निवडणुकीत मिळाल्या आहे. भाजपने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत १ लाख ३४ हजार ४९६ मते मिळविली आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ लाख १ हजार ८५२ मते मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५२ हजार ५९१ मते मिळाली आहे. शिवसेनेला २९ हजार ८६८ तर आदिवासी विद्यार्थी संघाला २९ हजार ६८९ मते मिळाली आहे. बहुजन समाज पक्षाला ५ हजार २८ मते मिळाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४३ जागावर निवडणूक लढली तर भारतीय जनता पार्टी ४९ जागांवर निवडणूक लढली. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ४१ जागांवर तर शिवसेना २३ जागांवर निवडणूक लढली. बहुजन समाज पार्टी १२ जागांवर निवडणूक लढली. आदिवासी विद्यार्थी संघ १४ जागांवर निवडणूक लढला. त्या तुलनेत त्यांना ही मते मिळाली आहे. आदिवासी विद्यार्थी संघाला २९ हजार ६८९ मते अवघ्या अहेरी विधानसभा क्षेत्राच्या १४ जागांवर मिळालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिन्ही विधानसभा क्षेत्रात काही जागांवर निवडणूक रिंगणात होता. त्यांना त्या तुलनेत ५१ हजार ४३७ मते मिळाली आहे. काँग्रेस गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दोन जागांवर निवडणूक रिंगणात नव्हता तर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत १ लाख १ हजार ७८१ मते मिळाली आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद व त्यानंतर झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा विचार करता भाजपचा जनाधार वाढलेला आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खासदार, आमदार प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले होते. त्या मताधिक्याच्या तुलनेत आता भाजपचा जनाधार बराच घसरलेला दिसत आहे. या निवडणुकीत जरी इतर पक्षाच्या तुलनेत भाजप आघाडीवर असला तरी त्या निकषावर भाजप कमी आहे.
भाजपचा ग्रामीण भागात जनाधार वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:20 IST