घोट : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १५ जागांपैकी सुमारे ९ जागा भाजपप्रणित ग्रामविकास पॅनलने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे निवडून आलेल्या १५ उमेदवारांपैकी सुमारे १४ उमेदवार नवीन आहेत. तरूणांच्या हाती घोट ग्रामवासीयांनी ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली आहे. कवडू गणपती भोवरे हे एकमेव जुने उमेदवार निवडून आले आहेत.प्रभाग क्रमांक १ मधून विनय ढिवरू बारसागडे, माया विशाल वाळके, पठाण सहिदा बेगम, मेहमूदखॉ हे उमेदवार विजयी झाले आहेत. हे तिन्ही उमेदवार ग्रामविकास पॅनलचे आहेत. प्रभाग क्रमांक २ मधील विनोद धनवंत वडेट्टीवार, दीपक गणपती दुधबावरे, उर्मिला नागोबा पोगुलवार हे उमेदवार विजयी झाले आहेत. हे तिन्ही उमेदवार विरोधी गटाचे आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून ग्रामविकास पॅनलच्या अर्चना रविंद्र चलाख व शालिनी संजय ठाकरे हे निवडून आले आहेत. विरोधी गटाचे कवडू गणपती भोवरे निवडून आले. प्रभाग क्रमांक ४ मधून विरोधी गटाचे अशोक नारायण पोरेड्डीवार, श्रीचंद चंद्रपाल उईके तर ग्रामविकास पॅनलच्या जोत्सना ओमनाथ चलाख या निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधील साईनाथ भिकारू नेवारे, सोनी सुभाष तलांडे व निरंजना राजेश्वर भांडेकर हे तिन्ही ग्रामविकास पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. १५ जागांपैकी ९ जागा जिंकून भाजप प्रणित ग्रामविकास पॅनलने घोट ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. स्पष्ट बहूमत मिळाल्याने गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. शालिनी संजय ठाकरे व सुमित्रा दिलीप मोहुर्ले या दोन्ही उमेदवारांना सारखीच मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढून निकाल घोषीत करण्यात आला आहे. यामध्ये शालिनी ठाकरे या विजयी ठरले. (वार्ताहर)
घोट येथे भाजपप्रणित ग्रामविकास पॅनलचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 05:35 IST