घोट : येथून ९ किमी अंतरावर असलेल्या माडेमुधोली येथील स्मशानभूमी जवळ रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर अपघात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. तुकाराम रामजी मडावी (३७) रा. कोरसेगटा असे मृतक इसमाचे नाव आहे. तुकाराम हा आबापूर येथे सासुरवाडीला गेला होता. काम आटोपल्यानंतर तो एमएच ३३ बी ७९८ या दुचाकीने आपल्या स्वगावाकडे परत जात होता. दरम्यान माडेमुधोली गावच्या स्मशानभूमीजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकीने रस्त्याच्या बाजुला असलेल्या येनाच्या झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत तुळशीराम मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. तुकाराम हा गंभीर जखमी अवस्थेत झाडाच्या बाजुला पडून होता. मात्र दारू पिल्याने तो आराम करीत असावा, असा प्रवाशांचा समज झाल्याने प्रवाशांनी याबाबतची माहिती बऱ्याचवेळ पोलीस स्टेशनला दिली नाही व त्याचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबतची माहिती घोट पोलीस मदत केंद्राला देण्यात आली. पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला. पुढील तपास घोट पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
दुचाकीची झाडाला धडक
By admin | Updated: March 16, 2015 01:11 IST