चातगावनजीकची घटना : दोघे जखमीधानोरा : भावाच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटण्यासाठी धानोराकडे विना क्रमांकाच्या नव्या दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या नीलगाईला दुचाकीची जबर धडक बसल्याने नीलगाय जागीच ठार तर दुचाकीवरील एक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास चातगावनजीक गिरोला-दुधमाळा दरम्यान घडली.प्रशांत टिकले रा. माडेतुकूम (२५), विजय भांडेकर (२३) रा. सामदा ता. सावली जि. चंद्रपूर असे जखमींची नावे आहेत. प्रशांत टिकले हा विजय भांडेकरसह भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीने गडचिरोलीवरून धानोराकडे जात होता. दरम्यान, चातगावनजीक रस्त्यावर आलेल्या नीलगाईला दुचाकीची जबर धडक बसली. यात नीलगाय जागीच ठार झाली. दुचाकीस्वार प्रशांत टिकले याचे दोन्ही पाय तुटले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर दुचाकीवर मागे बसलेला विजय भांडेकर याचे दोन्ही हात तुटले. दरम्यान, धानोरावरून गडचिरोलीकडे येणारे शिक्षक चलाख, कोहाडे, साळवे व चातगावचे पोलीस मेजर मानकर यांनी टॅक्सी करून जखमींना गडचिरोलीच्या रुग्णालयात आणले. या अपघातात ठार झालेली नीलगाय सहा वर्ष वयाची होती. ती पाण्याच्या शोधात तलावाकडे जात असताना रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसली. मृत नीलगाईचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सहायक उपवनसंरक्षक जे. एस. शिंदे, वनपरिक्षेत्राधिकारी आय. जी. निकम, वनपाल जे. आर. गेडाम, वनरक्षक ओ. एस. गेडाम, ज्योती कांदो, आर. एस. लांजेवार, वनपाल नंदकिशोर कोल्हे आदी उपस्थित होते. डॉ. अनिल डांगे यांनी नीलगाईचे शवविच्छेदन केले. मृत नीलगाईला दुपारी ३.३० वाजता जाळण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
दुचाकीची धडक नीलगाय ठार
By admin | Updated: March 31, 2016 01:40 IST