गडचिरोली : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमासंदर्भात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, अमोल मारकवार यांना ताब्यात घेतले होते. सायंकाळी ५ वाजता त्यांची सुटका करण्यात आली.सम्यक विद्यार्थी आंदोलन, बहुजन युवा मंच, आदिवासी विद्यार्थी संघटना, एआयएसएफ, एआयवायएफ आदी संघटनांच्या विद्यमाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थानिक प्रेसक्लब भवन येथे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व जातिअंताचा संघर्ष’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे हे नियोजित स्थळी गेले असता, पोलिसांनी त्यांना पकडून पोलिस ठाण्यात नेले. काही वेळानंतर भाकपचे जिल्हाध्यक्ष डॉ.महेश कोपुलवार यांनाही ठाण्यात नेले. २२ आॅक्टोबरला आरमोरी मार्गावरील एका सभागृहात वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणाच्या अनुषंगाने पोलिसांनी हिरालाल येरमे, विनोद झोडगे, रोहिदास राऊत, डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, अमोल मारकवार, माजी आमदार हिरामण वरखडे आदी जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्या गुन्हयांच्या अनुषंगाने पोलिसांनी शुक्रवारी रोहिदास राऊत, डॉ.महेश कोपुलवार ,देवराव चवळे व अमोल मारकवार यांना कलम १३५ अन्वये ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
भारिप व भाकपच्या चार नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By admin | Updated: January 30, 2016 01:56 IST