मागण्यांबाबत चर्चा : समस्या सोडविण्याचे डीएचओंचे आश्वासनगडचिरोली : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी दिल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण आंदोलन सोमवारीच सायंकाळी मागे घेतले.आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांच्या वतीने सोमवार पासून आंदोलन सुरू केले. आंदोलन सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांना आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी पाठविले. चर्चेदरम्यान महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मुद्दा सोडविला जाईल, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना पदोन्नती दिली जाईल, ३५३ आरोग्य सेवक व सेविकांना नियमित व स्थायी केले जाईल, कालबद्ध व प्रगती योजना लागू करण्यात येईल, दुसऱ्या व चवथ्या शनिवारी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुटी देण्याबाबत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना कळविले जाईल, हार्डशीप अलाऊन्स कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उपकेंद्रनिहाय उद्दीष्ट देण्यात येईल, आढावा सभेत दबाव तंत्राचा वापर केला जाणार नाही, मानधन व प्रवास भत्ता दिला जाईल आदी मागण्या मान्य करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे यांना लिंबूपानी पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी सचिव विनोद सोनकुसरे, अनिल मंगर, निलू वानखेडे, डी. टी. आंबोने, प्रभाकर म्हशाखेत्री, दुलसा हिचामी, तारकेश्वर मेश्राम, जी. एन. हेडो, एम. वाय. शेडमाके, टी. एस. कल्लुरी आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
By admin | Updated: April 27, 2016 01:29 IST