असंवेदनशील प्रसूती वार्ड ‘हाऊसफुल’ दिलीप दहेलकर
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्व १४ वार्डातील मिळून २२६ बेड मंजूर आहेत. या रूग्णालयात ३५० रूग्ण आज मंगळवारच्या तारखेत दाखल आहेत. प्रसूती वार्डात २६ बेड मंजूर असून अतिरिक्त ६ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या स्थितीत या वार्डात ७८ रूग्ण दाखल आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक महिला रूग्ण खाली गादीवर झोपून उपचार घेत आहेत.
‘लोकमत’ने आज प्रत्यक्ष भेट दिली असता, प्रसूती वार्ड रूग्णांनी हाऊसफुल झाले असल्याचे दिसून आले. आज ६ मे रोजी आॅन दी स्पॉट लोकमतने रूग्णालयाची वस्तूस्थिती जाणून घेतली असता, अनेक वार्डातील बहुतांश रूग्ण खाली झोपून उपचार घेत असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, प्रसूती वार्डात ७८ महिला रूग्ण दाखल असून यात प्रसुती झालेल्या २४ तसेच ४२ गरोदर महिला रूग्णांचा समावेश आहे. या वार्डात तब्बल ४८ गर्भवती महिला रूग्ण खाली गादीवर झोपून उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. या रूग्णालयातील प्रसूती वार्डात गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल, चिमूर, आदी तालुक्यातील तसेच गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील महिला रूग्ण दाखल होतात. जिल्ह्यात एकमेव मोठे रूग्णालय असल्याने या रूग्णालयात रूग्णांची व नातेवाईकांची रात्रंदिवस वर्दळ असते.
मात्र रूग्णांची संख्या लक्षात घेता येथे तज्ज्ञ व परिचारिका कमी पडतात. परिणामी रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत आहे. गर्भशयाच्या शस्त्रक्रियाही याच तज्ज्ञांकडून ४रूग्णालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये महिला रूग्ण दाखल राहतात. यात गर्भशयाचा त्रास असणार्या स्त्रियांची गर्भशयाची शस्त्रक्रिया करावी लागते. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रसूती वार्डातील तज्ज्ञांना गर्भशयाच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. यामुळे अनेक रूग्णांची हेळसांड होते. परिचारिकाही पडतात कमी ४सामान्य रूग्णालयातील प्रसूती वार्डात सध्या तीन प्रसूतितज्ज्ञ कार्यरत आहे. त्यांच्यासोबत ८ परिचारिका आहेत. या वार्डातील रूग्णांची संख्या लक्षात घेता तज्ज्ञ व परिचारिकाही कमी पडत आहेत. या ठिकाणी किमान पाच प्रसूतितज्ज्ञ असणे आवश्यक आहे. तीन तज्ज्ञांना कराव्या लागतात ४०० प्रसूती ४जिल्ह्यात एकमेव असलेल्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्षाकाठी साडेचार हजार प्रसूती होतात. महिन्याकाठी ४०० ते ४५० महिलांची प्रसूती केली जाते. परंतु मागील १५ ते २० दिवसांपासून या रूग्णालयातील एक महिला प्रसूतिज्ज्ञ कमी झाल्यामुळे येथे कार्यरत असलेल्या तीन प्रसूती तज्ज्ञांवरच कामाचा अधिक भार पडत आहे. येथील प्रसूती वार्डात महिन्याकाठी ६० टक्के सामान्य तर ४० टक्के प्रसुती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात येत आहे.
प्रसूतितज्ज्ञ डॉ. खोब्रागडे यांची ब्रम्हपूरी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसूतिज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या ब्रम्हपूरी येथे रूजू झाल्या असून त्यांच्या जागी दुसर्या प्रसूृतितज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली नाही. गतवर्षी दोनच प्रसूतितज्ज्ञांद्वारे येथील प्रसुती वार्डाची आरोग्य व्यवस्था सांभाळण्यात आली. प्रसूतितज्ज्ञांची दोन पदे रिक्त असल्याने कार्यरत प्रसूतितज्ज्ञांना सलग चोवीस तास सेवा द्यावी लागत आहे. सामान्य रूग्णालयात प्रसूतितज्ज्ञांची पाच पदे मंजूर आहेत. प्रसूतितज्ज्ञ डॉ. खोब्रागडे ह्या ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रूग्णालयात रूजू झाल्या आहेत. त्यामुळे सध्या या ठिकाणी तीन प्रसूतितज्ज्ञ कार्यरत आहेत. कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील डॉ. माळाकोळीकर यांना प्रतिनियुक्तीवर घेण्यात येणार आहे. - डॉ. आर. एस. फारूखी, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली