आशावर्कर, गट प्रवर्तकाचा मेळावा : महेश कोपूलवार यांचे आवाहन
गडचिरोली : राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन २००४ पासून आशा वर्कर व गटप्रवर्तक जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देत आहे. मात्र शासन त्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे त्यांच्यावर वेठबिगारीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे. शासनाला जागे करण्यासाठी आशा वर्कर व गटप्रवर्तकांना संघर्षासाठी संघटीतपणे तयार राहावे, असे आवाहन भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार यांनी केले.
आयटकच्या नेतृत्वात आज मंगळवारी येथील ग्रामसेवक भवनात आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचार्यांचा तालुका मेळावा घेण्यात आला. यावेळी मागदर्शक म्हणून डॉ. कोपुलवार बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रजणी गेडाम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जि. प. सदस्य अमोल मारकवार, चंद्रभान मेश्राम, सुमन राऊत आदी उपस्थित होत्या. या मेळाव्यात आशा वर्कर, गटप्रवर्तकांच्या शासनस्तरावरील तसेच स्थानिकपातळीवरील समस्यांविषयी चर्चा करण्यात आली. विविध मागण्यासंदर्भात यापुढे आंदोलन छेडण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी आशा वर्कर व गटप्रवर्तकांची गडचिरोली तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात आली. मेळाव्याचे संचालन विनोद झोडगे यांनी केले तर आभार मालता नरूले यांनी मानले.