वैरागड : येथील बीएसएनएल टॉवरच्या बॅटऱ्या निकामी झाल्या असल्याने वीज जाताच क व्हरेज गायब होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २८ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत टॉवरसाठी बॅटऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. वैरागड परिसरातील नागरिकांना दूरसंचार सेवा मिळावी, यासाठी वैरागड येथे भारत संचार निगम लिमिटेडने मोबाईल टॉवर उभारला आहे. या टॉवरच्या बॅटऱ्या मागील काही दिवसांपासून नादुरूस्त होत्या. बॅटऱ्या काम करीत नसल्याने वीज पुरवठा खंडित होताच टॉवरला उर्जा मिळत नसल्याने टॉवर काम करणे बंद करीत होते. जेवढा वेळ विद्युत पुरवठा खंडित राहत होता. तेवढा वेळ परिसरात क व्हरेजच राहत नव्हते. त्यामुळे त्रस्त झालेल्या मोबाईलधारकांनी याबाबतच्या अनेक तक्रारी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे केल्या. मात्र याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. लोकमतच्या वृत्तानंतर मात्र या ठिकाणी बॅटऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करू शकणार आहे. त्यामुळे मोबाईलची समस्या काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वैरागड परिसरात इंटरनेटची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैरागड, देलनवाडी, मानापूर येथील काही नागरिकांनी बीएसएनएलची लॉन्डलाईन सेवा घेणे आवश्यक आहे. तेव्हाच या गावातील नागरिकांना ब्राँडबँड सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)
वैरागडच्या टॉवरला मिळाल्या बॅटऱ्या
By admin | Updated: January 31, 2015 01:38 IST