प्रवीण खेडकर - भाडभिडीचामोर्शी तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेले हळदवाही टोला हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात अद्यापही अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावाच्या विकासाकडे नवीन सरकारच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी आशा येथील नागरिक बाळगुण आहेत. गावात वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा असणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात स्मशानभूमी, आकर, ढोरफोडी या सुविधाही असणे गरजेचे असते. मात्र हळदवाहीटोला या गावाला या सोयीसुविधा अद्यापही मिळाल्या नव्हत्या. गावात या सुविधा नसणे हीच समस्या गावात निर्माण झाली आहे. गाव अद्यापही एका हक्काच्या नावापासून वंचित आहे. एखाद्या गावाजवळ ५-१० घराची नवीन वस्ती म्हणजे टोली, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र हळदवाहीटोला हे नाव हळदवाही गावाजवळ असल्याने पडलेले आहे. विशेष म्हणजे हळदवाही व हळदवाहीटोला या दोनही गावची लोकसंख्या सारखीच आहे. हळदवाही टोलात ६०० च्यावर नागरिक राहतात. गावात २०० च्या आसपास कुटुंब वास्तव्यास आहे. १७७.७८ हेक्टरवर गाव वसले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या गावास टोला म्हणणे अडचणीचे व अयोग्य वाटत असल्याने २००८ रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. यावेळी मात्र सदर प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला ७०० च्यावर पशुधन गावात आहेत. मात्र गावात आकर, ढोरफोडी, स्मशानभूमी नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र ५० टक्के शेतकऱ्यांनाच कन्नमवार जलाशयाचे पाणी मिळते. उर्वरित शेती कोरडवाहू आहे. गावालगतच आठ महिने वाहणारा नाला आहे. या नाल्यावर बंधारा बांधून शेतीला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या प्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
मूलभूत समस्या सुटल्या नाहीत
By admin | Updated: December 6, 2014 22:49 IST