आष्टीतील ग्रामीण बँक शाखा : वृध्दांनाही ताटकळत राहावे लागते रांगेतआष्टी : चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ग्राहकांची शनिवारी मोठी गर्दी उसळली होती. बँकेच्या दरवाजापर्यंत ग्राहक उभे असलेले आढळले. तर काही महिला बँकेच्या बाहेर ताटकळत बसलेल्या होत्या. दोन दिवसांच्या सुट्यानंतर शनिवारी गर्दी उसळली. आष्टी येथे मागील १६ वर्षांपासून ग्रामीण बँक कार्यरत आहे. या बँकेत ग्राहकांची संख्या अधिक आहे. पेपरमिलमधील कर्मचाऱ्यांचेही पगार याच बँकेतून होत असल्याने बँकेत नेहमी गर्दी असते. शिवाय संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना अशा अनेक योजनांचे बँक खातेदार आहे. बचत गटाच्या कर्ज योजना आदी अनेक व्यवहार येथून चालतात. ही बँक भाड्याच्या इमारतीत असल्याने पाहिजे तशा पुरेशा सुविधा येथे नाही. बँकेत ग्राहकांना बसण्यासाठी आसनांचा अभाव आहे. बँकेत इतर साहित्य ठेवले असून कॅश काऊंटरजवळही लोकांना व्यवस्थित उभे राहता येत नाही. बरेचदा बँकेच्या आतमध्ये ग्राहकांची गर्दी असल्याने पुढे जाण्यासही जागा नसते. सदर बँक अपुऱ्या जागेत असल्याने आतील भागात फार कमी ग्राहक राहू शकतात. उर्वरित ग्राहकांना बाहेर उभे राहावे लागते. दिवसभर महिला व वृध्दांना ताटकळत उभे राहावे लागते. भर उन्हाळ्याच्या दिवसात पुरेशा पाण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आलेली नाही. बँकेतील अपुऱ्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. बँक व्यवस्थापनाने याची दखल घेऊन सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिल्ह्यातील जुनी बँक म्हणून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची ओळख आहे. पूर्वी ग्रामीण बँक अशा नावाने ओळखली जाणारी ही बँक अलिकडच्या काळात विदर्भ कोकण बँक म्हणून ओळखली जाते. (वार्ताहर)
अपुऱ्या जागेमुळे बँक ग्राहकांना त्रास
By admin | Updated: April 17, 2016 01:11 IST