उमेशचंद्र चिलबुले यांचे प्रतिपादन : ग्रामसेवक युनियनचा पदग्रहण सोहळागडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्नीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेकदा निदर्शने, आंदोलन, मोर्चे व इतर लोकशाही माध्यमातून कार्य करीत आहे. कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय कदापी सहन करण्यात येणार नसून संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभी राहिल, असे प्रतिपादन जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी केले. जि.प. कर्मचारी महासंघ संलग्नीत ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीची पंचवार्षीक निवडणूक पार पडली व ग्रामसेवक संघटनेच्या नव्या कार्यकारीणीची घोषणा रविवारी करण्यात आली. त्यानंतर येथील अभिनव लॉनच्या सभागृहात आयोजित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजकुमार पारधी, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दूधराम रोहणकर, उपाध्यक्ष संजय खोकले, पांडुरंग पेशने, ग्रामसेवक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, माजी सरचिटणीस प्रदीप भांडेकर, भैय्याजी मुद्दमवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रतन शेंडे यांच्यासह जि.प. कर्मचारी महासंघ व ग्रामसेवक संघटनेच्या आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप भांडेकर, संचालन पांडुरंग पेशने यांनी केले तर आभार संजीव बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला संघटनेचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी
By admin | Updated: September 19, 2016 01:52 IST