गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या नगराध्यक्ष होण्याचा मान डॉ. अश्विनी सुधीर धात्रक यांना मिळणार आहे. शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन पत्र भरण्याची अंतिम तारीख होती. केवळ धात्रक यांचेच एकमेव नामांकन पत्र आल्याने त्यांची नगराध्यक्ष पदावर अविरोध निवड होणार आहे. डिसेंबर २०११ मध्ये गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रथम अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राखीव असल्याने भूपेश कुळमेथे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर अडीच वर्षाने खुला (महिला) प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राखीव झाले. त्यावेळी निर्मला दीपक मडके या नगराध्यक्ष झाल्या. सव्वा वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार डॉ. अश्विनी सुधीर धात्रक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या पंडित जवाहरलाल नेहरू प्रभाग क्रमांक ३ मधून गडचिरोली नगर पालिकेवर निवडून आल्या आहेत. गेल्यावेळी त्यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर होते. परंतु त्यावेळी मडके यांना लॉटरी लागली व आता धात्रक या आगामी सव्वा वर्ष नगराध्यक्ष पदावर राहतील. त्या युवाशक्ती आघाडीकडून गडचिरोली नगर पालिकेवर निवडून आल्या होत्या.
अश्विनी धात्रक होणार नव्या नगराध्यक्ष
By admin | Updated: September 12, 2015 01:17 IST