जल्लोषात स्वागत : गोदावरी नदीवरील पूल निर्मितीची फलश्रुतीसिरोंचा : सिरोंंचालगतच्या गोदावरी नदीवर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलावरून काही दिवसांपूर्वीच वाहतुकही सुरू झाली. त्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच तेलंगणा परिवहन विभागाची बस सिरोंचा शहरात दाखल झाली. या बसचे सिरोंचावासीयांनी जोरदार स्वागत केले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने सिरोंचा हे तेलंगणा राज्याशी बससेवेने जोडल्या गेले आहे. भविष्यात सिरोंचा आंतरराज्यीय बस वाहतुकीचे प्रमुख केंद्र राहणार आहे. सिरोंचाजवळून राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ जातो. हा महामार्ग छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र राज्याला जोडणारा दुवा आहे. त्यामुळे सिरोंचा येथून तीन राज्याच्या विविध भागात बसगाड्या सुरू होतील. आज तेलंगणा राज्याची बसगाडी सिरोंचात दाखल झाल्यावर नागरिकांनी सिरोंचा बसस्थानकावर या बसगाड्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नामुळे गोदावरी नदीचा पूल पूर्णत्वास आला आहे. या पुलामुळे आपल्या विकासाचे द्वार खुले होण्याचा दिवस उजाडला, अशी भावना सिरोंचावासीयांच्या मनात आज दिसून आली. (शहर प्रतिनिधी)
तब्बल १०० वर्षानंतर तेलंगणच्या बसचे सिरोंचात आगमन
By admin | Updated: August 25, 2016 01:00 IST