कोरची : स्थानिक राजीव भवनात सोमवारी आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५ जोडपी विवाहबद्ध झाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मेघराज कपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे होते. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, पंचायत समिती सभापती अवधराम बागमुळ, नाना नाकाडे, आनंद चौबे, नसरूद्दीन भामानी, कमलनारायण खंडेलवार, अशोक गावतुरे उपस्थित होते. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे वधू- वर पित्याच्या आर्थिक खर्चात बचत होते. सध्या महागाई वाढल्याने वस्तूंचे नियोजन करतांना वधूपिता हतबल होतो. नियोजनातही हजारो रूपयांचा खर्च होतो. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळे पैशाच्या बचतीकरिता उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. सामूहिक विवाह सोहळे मागील चार ते पाच वर्षांपासून कंवर समाजाच्या वतीने राबविले जात आहेत. त्यामुळे समाजातील वधू- वरांच्या खर्चात बचत होत आहे. यापुढेही सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. मेघराज कपूर यांनी केले. विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांना भर देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शामराव जनकातन, प्रास्ताविक बख्खर यांनी केले. यशस्वीतेसाठी आदिवासी कंवर समाज सेवा संस्थेच्या सदस्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
कोरचीत १५ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: April 29, 2015 01:41 IST