जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश : महसूल विभागाची आढावा बैठक गडचिरोली : नगर रचना विभागानी जमीन एनए करण्याकरिता मंजुरी देताना शासनाच्या ठरवून दिलेल्या कागदपत्रांची व नियमांचे पालन करून मंजुरी प्रदान करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. महसूल विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत त्यांनी पीक कर्ज वाटपाला प्राधान्याने महत्त्व देऊन शेतकऱ्यांना योग्य कागदपत्रे त्वरेने उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना दिल्या. तालुक्याच्या ठिकाणी शिबिर आयोजित करून ग्रामस्थांना याबाबतची माहिती द्या, तसेच सेतू केंद्र, आधार कार्ड, अन्न धान्य पुरवठा, संजय गांधी स्वावलंबन योजना, निवडणूक, करमणूक, जमीन शाखा, गौणखनिज आदी विभागाच्या बाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, जयंत पिंपळगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, एस. व्ही. आंधळे, जी एन. तळपादे, एस. राममूर्ती यांच्यासह तहसीलदार हजर होते (प्रतिनिधी)
एनएबाबत नियमांचे पालन करून मंजुरी द्या
By admin | Updated: July 27, 2016 01:39 IST