अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी पेरमिली : जिल्ह्यातील ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन त्यांचे शासन सेवेत समायोजन करावे, अशी मागणी जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यात हिवतापाच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारी २०१६ मध्ये निवड प्रक्रिया राबवून ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची निवड केली. हंगामी क्षेत्र कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी मलेरिया नियंत्रणाच्या कामावर कार्यरत असून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. हिवताप नियंत्रणाच्या कामासह आरोग्य विभागातील क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी, पाणी नमूने तपासणी, हत्ती रोगाच्या गोळ्या वाटप करणे, गरोदर मातांना रुग्णांलयात भरती करणे, कुटुंब नियोजन कार्यक्रम आदी कामे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या नाही. हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना २०१७ मध्ये नियुक्ती आदेश द्यावे, ३७६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर प्रत्येकी दोन हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सर्व ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, प्रत्येक सत्रात ११ महिन्यांचा निरंतर नियुक्ती आदेश द्यावा, सेवा ज्येष्ठता यादीत हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे नाव समाविष्ट करावे, वैध अनुभव प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे, मासिक मानधन प्रत्येक महिन्याच्या निश्चित तारखेला द्यावे तसेच प्रत्येक महिन्यात सलग २९ दिवसांचे आदेश द्यावे, कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या वतीने संकेत येगलोपवार व इतर कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. आरोग्य अधिकारी, आरोग्य संचालक, उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्या
By admin | Updated: February 5, 2017 01:38 IST