बीडीओंना निवेदन : ग्रामसेवकाच्या गैरव्यवहाराची चौकशी कराचामोर्शी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत नवेगाव माल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ए. एम. शेंडे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून संतप्त झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी शनिवारी नवेगाव माल ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. बीडीओला निवेदन देऊन ग्रामसेवकाच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शनिवारी ३० मे रोजी नवेगाव माल ग्रामपंचायतीची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपस्थित ग्रामस्थांनी २०१४-१५ या वर्षातील आर्थिक खर्चाचा ग्रामसेवक ए. एम. शेंडे यांना हिशोब मागितला. मात्र आर्थिक उलाढालीची माहिती देण्यास ग्रामसेवक शेंडे यांनी टाळाटाळ केली. माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज सादर करण्याचा सल्लाही या ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना दिला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला मिळालेली पुरस्काराची रक्कम ग्रामसेवकांनी हडप केल्याचा आरोप या सभेत ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. त्यानंतर चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले. यावेळी सरपंच सुभाष डायगी, उपसरपंच संतोष दिघोरे, ग्रा.पं. सदस्य कालिदास पिठाले, तंमुस अध्यक्ष संतोष कुकुडकार, वसंत रामटेके, रतन गावडे, परशुराम बोलीवार, प्रविण चौधरी, विकास कोहपरे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)या आहेत ग्रामस्थांच्या मागण्याग्रामसेवक शेंडे यांच्याकडून २०१४-१५ वर्षात झालेल्या ग्रा.पं.च्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी.बेशिस्त ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला मिळालेल्या पुरस्काराच्या रक्कमेचा विनियोग झाला काय? याची सखोल चौकशी करण्यात यावी.जि.प. सीईओंनी या प्रकरणाची दखल घ्यावी.
संतप्त ग्रामस्थांनी नवेगाव माल ग्रा.पं.ला ठोकले कुलूप
By admin | Updated: May 31, 2015 01:18 IST