बस सुविधेच्या मागणीसाठी : एसटी महामंडळाविरोधात पुकारला एल्गार देसाईगंज : राज्य परिवहन महामंडळाचे नियमित पासधारक प्रवाशी असताना सुध्दा शालेय विद्यार्थ्यांना बस थांबविली जात नाही. बहुतांशवेळा विद्यार्थ्यांसाठी बस उभी राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. महामंडळाकडून बस सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून देसाईगंज तालुक्याच्या सावंगी येथील संतप्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत लाखांदूर वडसा मार्गावर सावंगी येथे चक्काजाम आंदोलन केले. चक्काजाम आंदोलनामुळे लाखांदूर-वडसा मार्गावर दोन्ही बाजुला वाहनांची मोठी रिघ लागली. देसाईगंज येथील वाहतूक पोलिसांनी तत्काळ एसटी महामंडळाच्या ब्रह्मपुरी शाखेच्या व्यवस्थापकांशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. त्यांच्या सकारात्मक पवित्र्याने विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा निघाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सदर चक्काजाम आंदोलन मागे घेतले. रस्ता मोकळा झाल्यानंतर वाहतूक सुरू झाली. लाखांदूर मार्गावर असलेल्या सावंगी येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी देसाईगंज शहरात शिक्षणासाठी महामंडळाच्या बसने ये-जा करतात. मात्र नियमानुसार पासधारक असतानाही विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जात नाही. प्रसंगी विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाला बुटी मारावी लागते. बस सुविधेच्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. दरम्यान देसाईगंज येथील वाहतूक पोलीस सावंगी येथे पोहोचले. त्यांनी एसटी महामंडळाच्या ब्रह्मपुरी येथील शाखा व्यवस्थापक जगदिश म्हशाखेत्री यांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले. व्यवस्थापक म्हशाखेत्री यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून असा प्रकार एसटी महामंडळाकडून होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शालेय वेळात बस सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन थांबविले. (वार्ताहर)
संतप्त विद्यार्थ्यांनी केला चक्काजाम
By admin | Updated: July 28, 2016 02:01 IST