गडचिराेली : गडचिराेली शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली असली तरी ग्रामीण भागातून जिल्हास्थळी येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम असल्याचे बसस्थानकातील गर्दीवरून दिसून येते.
गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या १७ एवढी कमी झाली हाेती. त्यानंतर मात्र मागील आठ दिवसांत सातत्याने काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, उपचार सुरू असलेल्या एकूण ६४ रुग्णांपैकी ५० रुग्ण गडचिराेली शहर व तालुक्यातील आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका शहरातच अधिक आहे. काेराेना रुग्णांची संख्या गडचिराेली शहरात वाढत असल्याने शहरात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कमी हाेईल, असा अंदाज हाेता. मात्र विविध प्रशासकीय कामे, बँका व गडचिराेलीवरून इतर गावांना जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक गडचिराेली शहरात येत असल्याचे दिसून येत आहे. साेमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळपासूनच बसस्थानक परिसरात गर्दी हाेती. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसमध्येसुद्धा प्रवाशांची गर्दी दिसून आली.
बाॅक्स...
ना मास्क, ना डिस्टन्सिंग
जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी याेग्य ती काळजी घेण्याचे आवाहन एसटीमार्फत केले जात आहे. बसस्थानकात असलेल्या ध्वनिक्षेपकावरून संदेश दिला जात आहे. काही नागरिकांनी नियमांचे पालन करीत ताेंडाला मास्क लावल्याचे दिसून येत हाेते. मात्र, काही नागरिक बसमध्ये बिनधास्त बसल्याचे दिसून येत हाेते. त्यामुळे काेराेनाचे हे संकट पुन्हा शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स...
चालक-वाहकांच्याही ताेंडाला मास्क नाही
काेराेनापासून प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक चालक व वाहकाने मास्क घालणे आवश्यक केले आहे. मास्कशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. तसेच मास्क घालण्याविषयीच्या सूचना प्रवाशांना द्याव्यात, असे निर्देश एसटीमार्फत चालक व वाहकांना देण्यात आले असले तरी फार कमी चालक व वाहक या नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून येत हाेते. चालक व वाहकांच्याच ताेंडाला मास्क नसल्याने त्यांनी इतरांना मार्गदर्शन न केलेलेच बरे.
बाॅक्स...
शनिवारी व रविवारी काही फेऱ्या बंद
शनिवारी व रविवारी शासकीय कार्यालयांना सुटी राहत असल्याने ग्रामीण भागातून नागरिक शहरात येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसला फारसे प्रवास मिळत नाहीत. त्यामुळे शनिवारी व रविवारी ग्रामीण भागात चालणाऱ्या काही बसफेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत.