लक्षवेध दिन पाळला : ११ पासून लेखणीबंद आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नवनिर्मित मृद व जलसंधारण विभागात कृषी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्ग करण्यात येऊ नये, लिपिक प्रवर्गाच्या प्रस्तावित आकृतीबंधाला तत्काळ मंजुरी द्यावी, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी विभाग लिपीक संवर्ग संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष डी. जी. गेडाम, कोषाध्यक्ष पी. व्ही. फुलंबरकर, संघटन सचिव व्ही. एन. कटारे यांच्यासह कृषी विभागातील बहुसंख्य लिपिकवर्गीय कर्मचारी उपस्थित होते. लिपीक संवर्गातील राज्य तसेच विभागीयस्तरावरील रिक्तपदे पदोन्नती व नामनिर्देशाने तत्काळ भरण्यात यावी, संवर्ग बदलून मिळण्यासाठी सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी, सहायक अधीक्षक व अधीक्षक संवर्गातील सर्व पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्याबाबतची कार्यवाही करावी, आदी मागण्या संघटनेने केले आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास ११ व १२ जुलैला कृषी विभागातील लिपिकवर्गीय कर्मचारी लेखनीबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यापुढे बेमुदत उपोषण करण्यात येईल, असेही संघटनेने म्हटले आहे.
कृषीच्या लिपिकांची निदर्शने
By admin | Updated: July 2, 2017 01:54 IST