राज्य शासनाचा निर्णय : अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्षगडचिरोली : मॅगी नुडल्समध्ये घातक घटकद्रव्य आढळून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मॅगीच्या विक्रीवर ५ जून रोजी बंदी घातली असली तरी, जिल्हाभरातील दुकानांमध्ये खुलेआम मॅगीची विक्री केली जात आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मॅगीचे नुमने सदोष आढळल्यानंतर राज्य शासनाने मॅगीच्या विक्रीवर संपूर्ण राज्यात बंदी घातली आहे. राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला खाद्यपदार्थ विकला जात असेल तर सदर दुकानदारावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत. बंदी घालून दोन दिवसांचा कालावधी उलटला असला तरी किराणा व बेकरीच्या दुकानात मॅगीची खुलेआम विक्री केली जात आहे. बंदीपूर्वी दुकानदारांनी हजारो रूपयांचे मॅगीचे पॉकेट खरेदी करून ठेवले आहेत. सदर पॉकेट न विकल्यास हजारो रूपयांचा तोटा त्यांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बंदी असल्याचे माहित असूनही दुकानदार मॅगी पॉकेटांची विक्री करीत आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजुनपर्यंत एकाही विक्रेत्यावर धाड टाकली नाही. त्यामुळे मॅगीवरील बंदी इतर उत्पादनांप्रमाणेच एक फार्स असल्याची टिका नागरिकांकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
बंदीनंतरही मॅगीची विक्री सुरूच
By admin | Updated: June 8, 2015 02:13 IST