गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत ३१ मे २०१३ नंतर तब्बल २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या करण्यात आल्याचे प्रकरण शासनस्तरावर पोहोचले. चौकशीदरम्यान बोगस शिक्षक बदली प्रकरणात दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजाविण्यात आली असून शासनस्तरावर या प्रकरणी कारवाई सुरू असल्याची माहिती राज्याच्या ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात १६ मार्च रोजी दिली. गडचिरोली जिल्हा परिषदेत ३१ मे २०१३ नंतर २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या करून त्याचे आदेश काढण्यात आले. याबाबतचा अहवाल जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाला २०१४ च्या एप्रिल महिन्यात सादर केला. या बोगस बदली प्रकरणाची चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या बदली प्रकरणात दोषी आढळून आलेल्या अधिकारी व शिक्षकांवर शासनस्तरावरून कारवाई सुरू आहे. या प्रकरणाबाबत लोकप्रतिनिधींच्या सुध्दा तक्रारी शासनाला प्राप्त झालेले आहे, अशी माहिती ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.आमदार नागो गाणार, आमदार प्रा. अनिल सोले, सुनिल देशमुख यांनी ६५०१ क्रमांकाचा बोगस बदली प्रकरणाबाबतचा तारांकित प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. (स्थानिक प्रतिनिधी)
दोषींवर कारवाई होणार
By admin | Updated: March 18, 2015 01:42 IST