धानोरा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून वर्षभराचा वाद उकरून काढून एका इसमाने दुसऱ्या इसमावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १० मार्च रोजी तालुक्यातील निमगावजवळील बोरी येथे सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. धानोरा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी चरणदास सुखरू खोब्रागडे (५८) रा. निमगाव याचेवर भादंविचे कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला. १० मार्च रोजी निमगाव येथील भगवान वसंत खोब्रागडे (३६) हे आपल्या कुटुंबियासह नजिकच्या बोरी गावात नाट्य प्रयोग पाहून आपल्या घरासमोर आले. दरम्यान दबा धरून बसलेल्या चरणदास खोब्रागडे याने टोकदार शस्त्राने दुचाकीवरील भगवान खोब्रागडे याचेवर हल्ला केला. मात्र भगवान बाजुला वाकल्याने त्याच्या मांडीला जखम झाली व भगवान बचावला. त्यानंतर भगवानची पत्नी गोपीका, मुलगा आयुष, मुलगी करूना हे अंगणातील प्रवेशद्वार उघडून आत गेले. त्यानंतर आरडाओरडा केल्याने हल्लेखोर इसम चरणदास घटनास्थळावरून पसार झाला. सध्या जखमी झालेले भगवान खोब्रागडे हे धानोराच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. दोन दिवसानंतर चरणदास खोब्रागडे हा पोलिसांपुढे शरण आला. न्यायालयाने त्याला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपी चरणदास खोब्रागडे हा आता वेड्यासारखा वागत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल
By admin | Updated: March 16, 2015 01:12 IST