छल्लेवाडा येथील घटना : बांबू, रांजीवर अवयव आढळलेअहेरी : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे चितळाची शिकार करून आरोपी फरार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या आरोपीला अद्यापही पकडण्यात यश आलेले नाही. छल्लेवाडा येथील रवी कुंभारे याच्या घरी चितळाचे मांस असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर धाड घालण्यात आली. वन्य प्राण्यांचे मांस त्याच्याकडे आढळून आले. तसेच घरापासून काही अंतरावर बांबूच्या रांजीवर चितळाचे मुंडके व चार पाय आढळून आले. याप्रकरणी वन विभागाने चितळ मांस व चितळाचे सर्व अवयव ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी इसम फरार झाला असून त्याच्या विरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या २, ९, ३१, ३२, ३९, ४३, ४४ कलमान्वये रेपनपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ईतवाते यांनी दिली. सदर कारवाई त्यांच्या मार्गदर्शनात राजारामचे वनपाल एल. पी. चकीनारपवार, डी. व्ही. पोशाली, एच. ए. बोबाटे, टी. व्ही. बत्तुलवार, एल. के. मेश्राम, पेरकी, पाटेवार, गणेश अडगोपुलवार यांनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)
चितळाची शिकार करून आरोपी फरार
By admin | Updated: December 24, 2015 01:56 IST