गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील कासवी, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा व चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात एकाच महिलेचे अवयव पंधरा दिवसांपूर्वी आढळून आले होते. या प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी छडा लावला असून आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. आरोपी हा सदर महिलेचा पतीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुधीर सीताराम कोहाळ (२५) रा. भंडारा असे आरोपीचे नाव आहे. तर हीना सुधीर कोहाळ (१९) असे मृतक महिलेचे नाव आहे. आरोपी सुधीर हा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान समुपदेशक म्हणून मागील काही दिवसांपासून काम करीत होता. सुधीर व हीना यांच्यामध्ये मोबाईलच्या मिसकॉलवरून जवळीक निर्माण झाली. काही दिवसात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हीनाने सुधीरकडे लग्नाची मागणी केल्यानंतर सुधीरने त्यास विरोध दर्शविला. मात्र हीनाने लग्नासाठी सुधीरकडे तगादा लावल्याने दोघांचाही एक वर्षापूर्वी गावकऱ्यांनी मंदिरामध्ये विवाह लावून दिला. हीना ही सुधीर व त्याच्या कुटुंबीयांना अजिबात पसंत नव्हती. त्यामुळे सुधीर व हीना यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत होते. सुधीर हा आपल्याला त्रास देत असल्याबाबत हीनाने एक-दोन वेळा गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी सुधीरने हीनाला पचमढीलाही नेले होते. पचमढीवरून वापस आल्यानंतर कासवीच्या जंगलात नेऊन तिचा १४ एप्रिल रोजी खून केला. त्यानंतर पुरावा मिटविण्यासाठी तिच्या शरीराचे आरीने आठ तुकडे केले. त्यापैकी एका पायाचा तुकडा घटनास्थळावरच ठेवला. इतर तुकडे एका बॅगमध्ये भरले. त्यापैकी दुसरा तुकडा देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरात टाकला. तर तिसरा तुकडा सावली तालुक्यातील खेडी गावाजवळ नेऊन फेकला. याबाबतचा गुन्हा आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असला तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनीही तपास सुरू केला. प्रेम प्रकरणातून ज्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये होत्या, अशा जोडप्यांचा शोध घेतल्यानंतर हीना बोकडे ही बेपत्ता असल्याचे दिसून आले. सुधीरची याबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने स्वत:च्या पत्नीचा खून केल्याचे कबूल केले. गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार उमेश बेसरकर व एसएसआय रोहणकर यांनी केली.
महिलेच्या अवयवांचे तुकडे करणारा आरोपी गजाआड
By admin | Updated: May 10, 2015 01:17 IST