दुर्लक्ष : रपट्यावरच्या सळाखी निघाल्या बाहेरभामरागड : भामरागडपासून सहा किमी अंतरावर कुमरगुडा नाल्यावर गिट्टी उखडून सळाखी बाहेर आल्याने मोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे दररोज दिवसा व रात्री दुचाकीला अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण अपघातात गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या. भामरागड-आलापल्ली मार्गावर दररोज शेकडो वाहनांचे आवागमन आहे. भामरागडपासून सहा किमी अंतरावर कुमरगुडा नाला असून येथील रपट्यावरच्या सळाखी पूर्णपणे उखडून गेल्या आहे. नाल्यावरील रपट्याला खड्डे पडले आहेत. १० वर्षांपासून कुमरगुडा नाल्यावर पूल बांधण्याची मागणी होत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी येथे मंजुरी देण्यात आली होती. परंतु बांधकाम सुरू झाले नाही. ते रखडून पडले आहे. येथे रपटा तुटल्याने वाहनांना आवागमन करण्यास अडचण येत आहे. अनेकजण दुचाकीवरून या खड्ड्यात पडून जखमी झाले. त्यांना हेमलकसा येथील रुग्णालयात भरती करावे लागले. भामरागडकडून आलापल्लीकडे येणारे वाहन भरधाव येते. रात्रीच्या सुमारास खड्डे न दिसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्यांच्याकडून रपट्यावरील खड्ड्याची दुरूस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे भामरागडवासीय त्रस्त आहेत. रस्ता दुरूस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भामरागडच्या नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
कुमरगुडा पुलावर अपघात वाढले
By admin | Updated: December 23, 2015 02:04 IST