वैरागड : छत्तीसगड-तेलंगणा अशी आंतरराज्यीय हाेणारी वाहतूक कुरखेडा-देसाईगंज-आरमाेरी-गडचिराेली या नियमित मार्गाने न हाेता कुरखेडा तालुक्यातील गाेठणगाव फाटा ते वैरागड मार्गे आरमाेरी तालुक्यातील ठाणेगाव अशी हाेते. या मार्गावरून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
छत्तीसगड-हैद्राबाद अशी हाेणारी जड वाहतूक ही गाेठणगाव फाट्यावरून कुरखेडा-वडसा-गडचिराेली या राज्य मार्गाने हाेत नाही तर गाेठणगाव फाटा ते कढाेली-वैरागड-ठाणेगाव या मार्गाने हाेत आहे. वाहतूक हाेणारा हा मार्ग जिल्हा मार्ग आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून माेठमाेठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
१५ फेब्रुवारी राेजी साेमवारला दुपारी ३ वाजता वैरागड-मानापूर वळणावर ट्रक उलटला. मात्र सुदैवाने यात काेणतीही जीवितहानी झाली नाही. या जिल्हा मार्गाने जड वाहतूक करण्यात येऊ नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा केली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. जड वाहतुकीसाठी राज्य मार्ग असताना जिल्हा मार्गाचा वापर वाढला आहे. परिणामी हा मार्ग आता अपघाताचा मार्ग ठरत आहे. अपघात राेखण्यासाठी गाेठणगाव फाटा ते वैरागड या मार्गाने हाेणारी जड वाहतूक जिल्हा मार्गाने करण्यात येऊ नये. जड वाहतूक कुरखेडा-वडसा या राज्य महामार्गाने वळविण्यात यावी, अशी मागणी कढाेली, सावलखेडा, कराडी, खरकाडा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या मार्गावरील जड वाहतुकीमुळे कढाेली येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धाेका निर्माण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स ....
वन्यजीवांचा जाऊ शकताे बळी
गाेठणगाव फाटा ते ठाणेगावपर्यंतच्या मार्गाला दाेन्ही बाजूला जंगल आहे. परप्रांतीय वाहतूक रात्रीच्या वेळी या मार्गावरून चालते. रस्ता ओलांडतांना वन्यजीव वाहनांचे बळी पडत असल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. तडस, रानमांजर, ससा भेडकी यासारखे प्राणी या मार्गावरील अपघातात ठार झाले आहेत. त्यामुळे वन विभागानेसुद्धा बारकाईने लक्ष घालून या मार्गाने हाेणारी जड वाहतूक थांबविणे आवश्यक आहे.