बांधकाम दोन महिन्यांपासून बंद : वेलगूर येथील नळ योजनेसाठी खोदला खड्डाआलापल्ली (वेलगूर) : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील वेलगूर येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात पाणी साचले असून बांधकाम मात्र बंद आहे. परिणामी या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ग्रामपंचायत वेलगूरमध्ये येणाऱ्या वेलगूर व नवेगाव येथे नळ योजना सुरू करण्यासाठी गावामध्ये टाकीचे बांधकाम करायचे होते. यासाठी कंत्राटदाराने नवेगाव व वेलगूर येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदकाम केले आहे. मात्र पाणीटाकी बांधली नाही. वेलगूर येथील टाकीच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. या खड्ड्यातील पाणी पाहण्यासाठी शाळकरी विद्यार्थी डोकावून पाहातात. त्याचबरोबर काही नागरिकही कुतुहलापोटी खड्ड्यामध्ये डोकावतात. उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. तहाणलेले जनावरेही पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. परिणामी एखादे जनावर किंवा बालक अनावदानाने या ठिकाणी पडून मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने पाण्याच्या टाकीचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, अन्यथा ग्रामपंचायतीने कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी वेलगूर येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पाणी टाकीच्या खड्ड्याने अपघाताचा धोका
By admin | Updated: March 2, 2016 01:50 IST