परीक्षणासाठी पाणी नमुने पाठविले : कृषी विज्ञान केंद्राच्या आवारातील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : येथील चंद्रपूर मार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या बगिचामध्ये असलेल्या एका दोन फुटाच्या खड्ड्यातून गेल्या तीन दिवसांपासून गरम पाणी निघत आहे. बुधवारी सुध्दा ही प्रक्रिया सुरू होती. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पाणी नमुने परिक्षणासाठी घेतले आहेत. सोनापूर परिसरात असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या बगिचातील दोन फुटाच्या एका खड्ड्यातून गरम पाणी येत आहे. सोमवारी सकाळी कृषी विज्ञान केंद्राचा पहारीकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. माहिती मिळताच कृषी विज्ञान केंद्राच्या विषय तज्ज्ञांनी गडचिरोलीच्या भूजल सर्वेक्षण विभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ भूजल सर्वे अधिकारी लागलीच कृषी विज्ञान केंद्रात पोहोचले. खड्ड्यातून निघत असलेल्या गरम पाण्याचे त्यांनी निरिक्षण केले. दरम्यान यावेळी आजुबाजुची माती गरम असल्याचे निदर्शनास आले. सदर खड्ड्याच्या आसपासची जमीन ही शेतीची आहे. सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच पाहण्यासाठी लोकांची कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात प्रचंड गर्दी उसळली. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ दोन फुटाच्या खड्ड्यात थंड पाणी टाकून पाहिले. त्यानंतरही येथील पाणी गरमच असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तपासणी सुरू केली असून पाणी परिक्षणाची प्रक्रिया हाती घेतली आहे. पाणी परिक्षणानंतरच रहस्य कळणार आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राच्या बगिचात आम्ही पोहोचलो. तेथील दोन फुटाच्या खड्ड्यातून निघत असलेल्या गरम पाण्याचे निरिक्षण केले. पाणी नमुने परिक्षणासाठी घेण्यात आले आहे. सदर क्षेत्र थंड भागामध्ये मोडते. मात्र या परिसरातील खड्ड्यातून गरम पाणी निघत आहे. या प्रकरणाची गांभिर्याने चौकशी सुरू आहे. अनेकदा वीज तारांचे स्पार्कींग होते, त्यावेळी अशाच प्रकारे जमिनीतून गरम पाणी येत असते. मात्र याचा संबंध भूगर्भशास्त्राशी आहे की नाही, याबाबतची चौकशी सुरू आहे. -प्रदीप निखाडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास विभाग, गडचिरोली
अबब ! दोन फुटाच्या खड्ड्यात गरम पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 01:41 IST