आरमोरी : पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यातून रोगराई वाढण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. पण आरमोरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये मात्र एका सार्वजनिक नळाच्या खड्ड्यात चक्क नालीचे सांडपाणी साचत आहे. याच नळाचे पाणी अनेक लोक पिण्यासाठी वापरत असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशुद्ध पाणी पिण्यात गेल्यास विविध प्रकारचे आजार बळावण्याचा धोका नेहमीच असतो. पण आरमोरी शहरातील प्रभाग क्रमांक ३, बाजारपेठेमधील प्रगती चौक येथील बारसागडे यांच्या घरासमोर सार्वजनिक नळ आहे. हा नळ ३ ते ४ फूट खोल असलेल्या सिमेंट टाक्यांमध्ये लावण्यात आला आहे. या सार्वजनिक नळाला लागूनच नाली आहे. त्यामुळे नालीचे सांडपाणी सार्वजनिक नळाच्या खोल खड्ड्यात (टाक्यात) जमा होत आहे. त्या ठिकाणी अशुद्ध सांडपाणी साचून दुर्गंधीही पसरत आहे. अशा स्थितीत त्याच नळाचे पाणी नागरिक नाईलाजाने पिण्यासाठी वापरत आहे.
(बॉक्स)
- तर नगर परिषद राहणार जबाबदार
वॉर्डातील नागरिकांनी याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार मागणी करून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. मात्र आरोग्याशी खेळ ठरणाऱ्या या गंभीर बाबीकडे नगरसेवकासोबतच नगर परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अशुद्ध पाण्याने प्रकृती बिघडून काही बरेवाईट झाल्यास त्यासाठी नगर परिषदच जबाबदार राहील, असा इशारा आता या भागातील नागरिकांनी दिला आहे.
210721\img-20210720-wa0060.jpg
आरमोरी प्रभाग क्रमांक ३मधील प्रगती चौकातील सार्वजनिक नळ असलेल्या टाक्यात नालीचे साचलेले सांडपाणी