गडचिरोली : शासकीय योजनांच्या लाभासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले आधार कार्ड आता जिल्ह्यातील ८० टक्के नागरिकांना प्राप्त झाले असून आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरूच असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ७१ हजार ७९५ एवढी आहे. चार वर्षांच्या कालावधीत किमान १ लाख लोकसंख्येची भर पडून २०१४ पर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्या जवळपास पोहोचली असावी, असा अंदाज प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एप्रिल २०१४ पर्यंत जिल्ह्यातील ८ लाख ४१ हजार ४८९ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात २ लाख ३० हजार ३२४ नागरिकांचे आधार कार्ड काढल्या गेले. त्यानंतर आधार कार्डविषयी थोडे वाद निर्माण झाल्याने आधार कार्ड काढण्याची मोहीम थांबविण्यात आली होती. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून ही मोहीम आता सातत्याने सुरू आहे. सध्या दुसरा टप्पा सुरू असून या अंतर्गत ६ लाख ११ हजार १६५ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील आधार कार्ड काढण्याचे कंत्राट घेण्यास मोठ्या कंपन्या तयार नव्हत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने स्वत: किट खरेदी करून लहान एजन्सीच्या मार्फतीने आधार कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. दुर्गम भागात कव्हरेजची समस्या असल्याने कर्मचारी पेनड्राइव्ह सहाय्याने डेटा आणून जिल्हा किंवा तालुका स्थळावरून पाठविला जातो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन आधार कार्ड काढले आहेत. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के नागरिकांकडे आधार कार्ड आहेत. काही नागरिकांना मात्र आधार कार्ड मिळालाच नसल्याने त्यांनी दोन वेळा आधार कार्ड काढला असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
८० टक्के नागरिकांकडे आधार कार्ड
By admin | Updated: November 29, 2014 01:13 IST