प्रशासनाची तयारी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकदिलीप दहेलकर गडचिरोलीफेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषद व जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१७ या अहर्ता दिनांकावर आधारित जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी तयार केली आहे. यानुसार महिला व पुरूष मिळून एकूण ७ लाख १८ हजार ३४३ मतदार एकूण ९९८ केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबई येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गडचिरोली जिल्ह्यातील विपरित परिस्थिती लक्षात घेऊन दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यात निवडणूक होणार आहे. यामध्ये गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा या तालुक्यांचा समावेश आहे. येथे १६ फेब्रुवारीला मतदान होणार असून २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत नामांकन अर्ज भरले जातील. तर दुसऱ्या टप्प्यात अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड येथे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. २१ फेब्रुवारी रोजी येथे मतदान होणार आहे. १ ते ६ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. सदर निवडणुकीत ३६० केंद्र साधारण स्थितीतले राहणार आहेत. जि.प., पं.स. निवडणुकीत ६ लाख १० हजार ९९९ ग्रामीण मतदार तर १ लाख ७ हजार ३४४ शहरी मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रशासनातर्फे आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.३३४ मतदान केंद्र अतिसंवेदनशीलजिल्हा परिषदेच्या ५१ व पंचायत समितीच्या १०२ जागांसाठी गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात एकूण ९९८ मतदान केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ३३४ मतदान केंद्र अतिसंवेदनशील तर ३०४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांमध्ये कोरची तालुक्यातील २२, कुरखेडा तालुक्यातील ३२, देसाईगंज ९, आरमोरी २०, धानोरा ४५, गडचिरोली ७, चामोर्शी १६, मुलचेरा ९, एटापल्ली ७०, भामरागड २१, अहेरी ४६ व सिरोंचा तालुक्यात ३७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक ७० अतिसंवेदनशील मतदान केंद्र राहणार आहेत.जि.प, पं.स निवडणुकीसाठी ३०४ केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये कोरची तालुक्यातील १७, कुरखेडा ४२, देसाईगंज ८, आरमोरी ३५, धानोरा २३, गडचिरोली १२, चामोर्शी ५६, मुलचेरा ४०, एटापल्ली १, भामरागड ३, अहेरी ३६ व सिरोंचा तालुक्यात ३१ केंद्रांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ५६ संवेदनशील केंद्र आहेत.
९९८ केंद्रांवर होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:49 IST