हातपंप देखभाल दुरूस्ती : १३ कोटी ७१ लाख जमा गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाने मुलचेरा वगळता ११ तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून सन २०१६-१७ या वर्षात आतापर्यंत एकूण १३ कोटी ७१ लाख १ हजार २३४ रूपये हातपंप देखभाल दुरूस्तीपोटीची कर वसुली केली आहे. या वसुलीची सरासरी टक्केवारी ९३ आहे. काही ग्रामपंचायतींनी पं. स. कडे कराची रक्कम जमा केली आहे. मात्र पं. स. प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाकडे सदर कर वसुलीची रक्कम जमा केली नसल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाअंतर्गत गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, कोरची, देसाईगंज, भामरागड व मुलचेरा या १२ तालुक्यात एकूण ९ हजार १ हातपंप आहेत. यापैकी मुलचेरा वगळता ११ तालुक्यातील एकूण ७ हजार ३७२ हातपंपाच्या देखभाल दुरूस्तीच्या आकारणीबाबत पं. स. अंतर्गत ग्रामपंचायतींनी करारनामे केले आहेत. ७ हजार ३७२ हातपंपाची सन २०१६-१७ या वर्षाची कर आकारणीची मागणी एकूण १४ कोटी ७४ लाख ४ हजार रूपये इतकी होती. यापैकी आतापर्यंत १३ कोटी ७१ लाख १ हजार २३४ रूपयांची कर वसुली झाली आहे. यामध्ये काही ग्रामपंचायतींनी जुनी थकीत कर वसुली जमा केली आहे. त्यामुळे काही तालुक्यातील ग्रामपंचायतींची सरासरी कर वसुली वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीकडून १० लाख ७३ हजार ५४०, आरमोरी तालुक्यातून ६ लाख ८४ हजार ४९७, कुरखेडा ११ लाख ६९ हजार ३१५, धानोरा २१ लाख ५२ हजार ५१६, चामोर्शी १६ लाख २ हजार ७०९, अहेरी ३७ लाख २२ हजार १२३, एटापल्ली ३ हजार ६३९, सिरोंचा ४ लाख ४० हजार १३३, कोरची १० लाख ११ हजार २५९, देसाईगंज ३ लाख ४० हजार ४४५ व भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून १५ लाख ११ हजार ५८ रूपये याची कर वसुली जि. प. च्या यांत्रिकी विभागाकडे पं. स. मार्फत जमा करण्यात आली आहे. सदर हातपंप कर वसुलीची गडचिरोली तालुक्याची सरासरी टक्केवारी ५८.४७, आरमोरी ५५.३८, कुरखेडा ७७.६४, धानोरा १३४.३६ आहे. धानोरा पं. स. तील ग्रामपंचायतींनी गेल्या अनेक वर्षापासून थकीत असलेली जुनी हातपंप कराची रक्कम सन २०१६-१७ या वर्षात अदा केली. तसेच चालू वर्षाचीही कराची रक्कम जमा केली. त्यामुळे या तालुक्याची कर वसुलीची टक्केवारी १०० पेक्षा अधिक आहे. चामोर्शी ९०.६५, अहेरी २३५.२८, कोरची ९८.३७, एटापल्ली ०.२६ तर सिरोंचा तालुक्यातील हातपंप कर वसुलीची टक्केवारी ३३.५५ आहे. (स्थानिक प्रतिनिधी) १० लाख ३२ हजारांची कर वसुली शिल्लक मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी हातपंप देखभाल दुरूस्तीबाबत पं. स. शी करारनामे केले नाही. या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती स्वत: हातपंपाची देखभाल व दुरूस्तीचे काम करतात. उर्वरित ११ तालुक्यातील हातपंपापोटी अद्यापही १० लाख ३२ हजार ७६६ रूपयांची हातपंप देखभाल दुरूस्तीची कर वसुली शिल्लक आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्याकडे ७ लाख ६२ हजार, आरमोरी ५ लाख ५१ हजार, कुरखेडा ३ लाख ३६ हजार, चामोर्शी १ लाख ६५ हजार, सिरोंचा ८ लाख ७१ हजार, देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे ३ लाख २१ हजार रूपये करापोटी शिल्लक आहेत. एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायती माघारल्या एटापल्ली तालुक्याच्या गावांमध्ये एकूण ८०१ हातपंप पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी उपलब्ध आहेत. यापैकी ७०८ हातपंपाच्या देखभाल दुरूस्तीबाबतचे करारनामे पंचायत समितीशी ग्रामपंचायतींनी केले आहेत. ७०८ हातपंपापोटी १४ लाख १६ हजार रूपये कर आकारणी चालू वर्षात झाली. मात्र ३ हजार ६३९ रूपये जमा करण्यात आले. केवळ ०.२६ टक्के कर वसुली झाली. एटापल्ली तालुका हातपंप कर वसुलीत माघारला आहे.
९३ टक्के कर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:54 IST