उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट : सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील हातपंप नादुरूस्तगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत. यापैकी सद्य:स्थितीत तब्बल ८८ हातपंप बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हातपंप दुरूस्तीच्या कामात पंचायत समितीस्तरावरून दिरंगाई होत असल्याचा आरोप गावातील नागरिकांकडून केला जात आहे.मुलचेरा तालुक्यासह एकुण १२ तालुक्यात ग्रामपंचायती अंतर्गत एकूण ९ हजार १ हातपंप आहेत. यापैकी ७ हजार ३७२ हातपंपाच्या देखभाल व दुरूस्ती संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी करारनामे केले आहेत. करारनामे करण्यात आलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील ९१८, आरमोरी ६१८, कुरखेडा ७५३, धानोरा ८०१, चामोर्शी ८८४, अहेरी ७९१, एटापल्ली ७०८, सिरोंचा ६५६, कोरची ५१४, देसाईगंज ३३१ व भामरागड तालुक्यातील ३९८ हातपंपाचा समावेश आहे. सद्य:स्थितीत बंद असलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, आरमोरी ४, कुरखेडा ३, धानोरा ८, चामोर्शी ८, अहेरी ४, सिरोंचा १५, कोरची १, भामरागड ४ व एटापल्ली तालुक्यातील सर्वाधिक ३१ हातपंपाचा समावेश आहे.सदर ८८ हातपंप बंद असल्याने संबंधित गावातील व परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील महिन्यात जिल्हाभरातील एकूण ४३७ हातपंप बंद पडले होते. त्यापैकी ३४९ हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली. अद्यापही ८८ हातपंप बंद आहेत. पंचायत समिती प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव व हातपंप देखभाल दुरूस्तीच्या वाहनाची संख्या कमी आहे. धानोरा तालुक्यात हातपंप दुरूस्तीसाठी पंचायत समितीकडे एकच वाहन उपलब्ध आहे. परिणामी तालुक्याच्या परिसर व गावातील संख्येचा आवाका लक्षात घेता तालुक्यात लवकर वाहन पोहोचत नाही. (नगर प्रतिनिधी)खंडित वीज पुरवठ्याने अनेक नळ पाणी योजना बंदग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने तालुका मुख्यालय व मोठ्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र काही गावातील पाणी योजनेचे लाखो रूपयांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरणने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून २५ वर नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याच्या काही गावातील जलशुध्दीकरण प्रकल्पही बंद पडले आहेत. काही गावातील सौरउर्जेवरील पाणी योजना नादुरूस्त आहेत.
जिल्ह्यातील ८८ हातपंप बंद
By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST