गडचिराेली : प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. गडचिराेली जिल्ह्यात प्राथमिकच्या जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळा आहेत. यापैकी यंदाच्या शैक्षणिक सत्रात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ७१८ आहे. पण पुरेशा पटसंख्येअभावी त्या शाळांचे अस्तित्व धाेक्यात येण्याची शक्यता आहे.
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक मिळून एकूण १ हजार ५१२ शाळा आहेत. यामध्ये १० शाळा माध्यमिक आहेत तर १ हजार ४९७ शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे. पाच ते सात वर्षांपूर्वी तत्कालिन राज्य सरकारने गडचिराेली जिल्ह्यासह राज्यभरात प्राथमिक व माध्यमिक शाळांची खैरात वाटली. गाव तिथे शाळा हे धाेरण अवलंबत जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या वाढविण्यात आली; मात्र बहुतांश शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या नसल्याने भविष्यात या शाळा बंद हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्यस्थितीत या शाळांमध्ये दाखल असलेले विद्यार्थी व कार्यरत शिक्षकांच्या समायाेजनेचा प्रश्न येत्या काही वर्षात बिकट हाेणार आहे. जि. प. शाळांमधील पटसंख्या वाढवून ती टिकून राहण्यासाठी विविध भाैतिक सुविधा, गुणवत्ता, इंग्रजी माध्यमातून शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास व संगणकाचे धडे जि. प. शाळांमधून देणे गरजेचे आहे. त्यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी हाेणे अत्यावश्यक आहे.
बाॅक्स .....
अशी आहे आकडेवारी
१,५१२- जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या
२०- पटसंख्येअभावी यापूर्वी बंद झालेल्या शाळा
७१८- २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा
बाॅक्स ...
२० च्या आत असलेल्या शाळांचा तालुकानिहाय घाेषवारा
तालुका संख्या
गडचिराेली ३५
आरमाेरी ३१
कुरखेडा ५२
धानाेरा १०२
चामाेर्शी १४६
अहेरी ११०
एटापल्ली १२६
सिराेंचा ६८
मुलचेरा २४
काेरची ६५
भामरागड ५६
देसाईगंज ०३
एकूण ७१८
काेट ........
गडचिराेली जिल्ह्याची भाैगाेलिक परिस्थिती इतर जिल्ह्याच्या तुलनेत वेगळी आहे. पटसंख्या कमी असली तरी त्या शाळा चालविणे आवश्यक आहे. कारण एकदा बंद झालेली शाळा पुन्हा सुरू हाेण्यास अनेक अडचणी येतात. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबतचे शासन स्तरावरून सध्यातरी कुठलेही निर्देश नाहीत. दुर्गम व डाेंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी तेथील शाळा सुरू असणे आवश्यक आहे. - आर. पी. निकम, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. गडचिराेली
बाॅक्स ......
१३०० शिक्षकांचे भविष्यात समायाेजन
जिल्हा परिषदेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यात दीड हजार शाळा चालविल्या जातात. यापैकी ७१८ शाळांमध्ये १ हजार ३०१ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमध्ये ७ हजार ६८३ इतके विद्यार्थी दाखल आहेत. राज्य शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास या शाळांमध्ये कार्यरत १३०० शिक्षकांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायाेजन करावे लागेल. तसेच येथील दाखल विद्यार्थी माेठ्या शाळांमध्ये समायाेजित करावे लागणार आहे.
बाॅक्स .....
आदिवासीबहुल भागातील समस्या ऐरणीवर
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या आदिवासीबहुल भागात जास्त आहे. यामध्ये धानाेरा, अहेरी, एटापल्ली, सिराेंचा, काेरची आदी तालुक्यांचा समावेश आहे. आदिवासीबहुल भागातील या शाळांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.