५१४ प्रकरणांचा निपटारा : गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक गडचिरोली : जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबवून संबंधित गौण खनिज तस्करांकडून एकूण ५८ लाख ३१ हजार ६८७ रूपयांचा दंड वसूल केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नऊ महिन्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत एकूण ५१४ प्रकरणे निकाली काढली. जिल्ह्यातील रेतीघाटावरून शासनाच्या नियमानुसार रेती व इतर गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक होणे आवश्यक आहे. याबाबत महसूल विभाग व जिल्हा खनिकर्म विभाग नियंत्रण ठेवत असते. गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटाची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त असलेल्या जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने दरवर्षी राबविल्या जाते. घाटाची विक्री झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना त्या घाटातून रेतीचे उत्खनन व वाहतूक करण्याचा परवाना दिला जातो. मात्र शासनाचे नियम असतानासुद्धा जिल्ह्यातील काही कंत्राटदार क्षमतेपेक्षा अधिक व जास्तीच्या क्षेत्रात रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करतात. काही कंत्राटदार टीपीपेक्षा अधिक रेती व इतर गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करतात. या अवैध उत्खनन व वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडचिरोली उपविभागात गेल्या नऊ महिन्यात १२० प्रकरणे निकाली काढून अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत एकूण १२० प्रकरणे निकाली काढली. या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून ८ लाख ९७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला. या उपविभागात गडचिरोली व धानोरा तालुक्याचा समावेश आहे. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत धाडसत्र राबवून एकूण ६६ प्रकरणे निकाली काढली. या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून १० लाख ६ हजार ७२१ रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नऊ महिन्यात १५२ प्रकरणे निकाली काढून एकूण ११ लाख १० हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा व कोरची तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध उत्खनन व वाहतुकीबाबतचे ४० प्रकरणे निकाली काढून एकूण २ लाख ७२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी व सिरोंचा तालुक्याचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागात अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत एकूण ११३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २३ लाख ६० हजार ५६६ रूपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला. एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागाच्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते डिसेंबर २०१६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत धाडसत्र राबवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत एकूण २३ प्रकरणे निकाली काढली व संबंधित कंत्राटदाराकडून १ लाख ८३ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. (स्थानिक प्रतिनिधी) कारवाईत अहेरी उपविभाग आघाडीवर गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचा प्रकार प्रचंड वाढला आहे. रेती व इतर गौण खनिजाची तस्करी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेक कंत्राटदार व तस्कर प्रयत्न करतात. दरम्यान गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवून सर्वाधिक दंड वसूल करण्याच्या कामात अहेरी उपविभाग आघाडीवर आहे. अहेरी तालुक्यातील महसूल विभागाने २७ प्रकरणे निकाली काढून २ लाख ३५ हजार ६०० तर सिरोंचा तालुक्यातील महसूल विभागाने ८६ प्रकरणे निकाली काढून २१ लाख २४ हजार २६६ रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागाने सर्वाधिक २३ लाख ६० हजार ५६६ रूपयांचा दंड वसूल केला. इतर उपविभाग कारवाईत माघारले आहे.
५८ लाखांचा दंड वसूल
By admin | Updated: January 22, 2017 01:33 IST